शुक्रवार, १० जून, २०१६

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ यावा

शिंपित पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी स्पर्शू मलाच यावा

देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावा

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा

तारावरी पडावा केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

आरती प्रभू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...